कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येवला, निफाड व नांदगाव तालुक्यांचा आढावावाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन अतिरिक्त बेडचे नियोजन करा :पालकमंत्री छगन भुजबळ

          
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येवला, निफाड व नांदगाव तालुक्यांचा आढावा
वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन अतिरिक्त बेडचे नियोजन करा :पालकमंत्री छगन भुजबळ
नाशिक, दि.28 जून 2020 (जिमाका वृत्तसेवा) :- कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता अतिरिक्त बेडचे नियोजन करण्यात यावे, असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येवला, निफाड आणि नांदगाव तालुक्यात प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना आणि नियोजनाबाबत आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी येवला संपर्क कार्यालय येथे आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपील आहेर, प्रांताधिकारी सोपान कासार, निफाडच्या प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे, येवल्याचे तहसीलदार रोहिदास वारुळे, निफाडचे तहसीलदार दीपक पाटील, मनमाड पोलिस उपअधीक्षक समरसिंग साळवे, निफाडचे पोलिस उपअधीक्षक माधव रेड्डी, गटविकास अधिकारी डॉ.उमेश देशमुख, निफाडचे गटविकास अधिकारी डॉ.संदीप कराड,  येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शैलजा कृपास्वामी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एच.आर. गायकवाड, लासलगाव येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ.सूर्यवंशी, शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी, तालुका पोलिस निरीक्षक अनिल भवारी, लासलगाव पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे, सहायक निबंधक एकनाथ पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी येवला, नांदगाव व निफाड तालुक्यातील कोरोनाबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा व नियोजनाचा आढावा घेतला. येवला शहरातील 100 टक्के कुटूंबाचे आरोग्याचे सर्वेक्षण आणि तपासणी पूर्ण झाली आहे. शहरात 1916 इतर आजारांनी ग्रस्त रुग्ण सापडले असून त्यांच्यावर विशेष लक्ष देण्यात येत आहे.त्यांना रोग प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी औषधे देऊन त्यांच्यावर नियमित लक्ष ठेवण्याच्या सूचना भुजबळ यांनी दिल्या.त्याचप्रमाणे येवला शहराच्या धर्तीवर जिल्ह्यातील इतर तालुक्यांची शहरे आणि ग्रामीण भागात सुध्दा तपासणी करण्याच्या सूचना दिल्या.जिल्ह्यात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 58 टक्के असून येवल्यात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 70 टक्के आहे,असे असले तरी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वेक्षण सुरूच ठेवावे अशा सूचना त्यांनी दिल्या.

कोरोनाला अटकाव घालण्यासाठी खाजगी डॉक्टरांशी संवाद साधून या प्रक्रियेत त्यांचीही मदत घेण्यात यावी अशा सूचना आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी येवला उपजिल्हा रुग्णालयाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाला आदेश दिले. तसेच शहरातील गर्दी टाळण्यासाठी दुकानांना वेळ वाढून द्यावी तसेच यावर पोलिसांनी नियंत्रण ठेवावे, दुकाने बंद करण्यासाठी कुणावरही दबाव आनू नये, दिलेल्या वेळेत दुकाने नियमित सुरू राहतील आणि नागरिकांना आवश्यक वस्तु मिळतील याची दक्षता घ्यावी अशा सूचना त्यांनी दिल्या.

त्याचबरोबर शेतकरी पीक कर्जाबाबत आढावा घेतला यावेळी  शासनाने दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत कमी कर्ज वाटप होत असल्याने अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारून दिलेल्या उद्दिष्टा प्रमाणे शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्याच्या सक्त सूचना दिल्या. तसेच मका खरेदी प्रक्रियेस मुदतवाढ मिळाली असून उर्वरित शेतकऱ्यांची मका लवकरात लवकर खरेदी करण्यात येऊन शेतकऱ्यांची संपुर्ण मका खरेदी करण्याचे आदेश पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी दिले. तसेच विजेच्या प्रश्नांबाबत आढावा घेऊन सूचना केल्या.

Comments