कोरोनाचा सुखद-दुःखद अनुभव
*कोरोनाचा सुखद-दुःखद अनुभव*
मजेत चालले होते आयुष्य, लॉकडाऊन च्या काळात बरेच दिवस घरी होतो.पण घरीपण किती दिवस राहणार...
त्यातच माझ्यानावे कार्यालयातून नोकरीत रुजू व्हावे म्हणून नोटीस निघाली.
घाईगडबडीत नोकरीत रुजू झालोही...
आठ-दहा दिवस व्यवस्थित कामकाज पार पाडल्यानंतर मला थोडा शारीरिक त्रास जाणवू लागला.मला वाटले गावाहून आलो आहे वातावरणातील बदलामुळे होत असेल,त्याकडे दुर्लक्ष न करता तात्पुरते घरगुती औषधोपचार केले.दुसऱ्या दिवशी शारीरिक त्रासाने पाय पसरण्यास सुरुवात केली.मी ताबडतोब मित्राला घेऊन डॉक्टरांकडे गेलो,त्यांनी तपासणी केली असता एक्स-रे व रक्ताची तपासणी करण्यास सांगितले,एक्स-रे मध्ये न्यूमोनियाचे निदान झाले.मी लगेच घरी फोन केला,वडील मला ताबडतोब दुसऱ्या दिवशी घेण्यास आले.माझा आजार तर बळावत चालला होता,वडील जरी माझ्या सोबत होते तरी त्यांच्याशी मी थोडे अंतर ठेवूनच होतो.गाडीतही मी त्यांच्याशी जास्त बोललो नाही.घरी येईपर्यंत गाडीत पूर्ण वेळ झोपून होतो.
घरी आल्यानंतर डॉक्टर मित्राला फोन केला,त्यांनी मला बोलावून घेऊन औषधोपचार केले.माझ्या तब्येतीत थोडी सुधारणा झाली.पण दुसऱ्या दिवशी मला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.मला पूर्ण खात्री झाली की ही सर्व 'कोरोना' ची लक्षणे आहेत.मी पुन्हा डॉक्टरांकडे जाऊन एक्स-रे काढला.त्यांनी सांगितले की छातीत खूप कफ जमा झाले आहेत.त्यांनतर त्यांनी सांगितले की तू ताबडतोब स्वब(Swab) देऊन ये.मी क्षणाचाही विलंब न करता मालेगाव येथे स्वब(Swab) देऊन आलो.घरी आलो असता कोणाच्याही संपर्कात न येता एका खोलीत बंदिस्त झालो.जास्त कोणाच्या संपर्कात न आल्यामुळे माझ्यामुळे कोणीही पॉसिटीव झाले नाही.आता रिपोर्ट येण्याची वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता.मला त्रास तर खूप होत होता,मी जास्त कोणाला काही बोललो नाही घरच्यांनी मला लांबून बघितले असता त्यांना माझी अवस्था पाहिली गेली नाही.
त्यातच आत्याचा फोन आला की तुझे मुंबई, नामपूर येथे काढलेले सर्व रिपोर्ट मला पाठव,त्या धुळे येथे सरकारी दवाखान्यात कार्यरत असल्यामुळे त्यांना याबाबत इत्यंभूत माहिती होती.त्यांनी रिपोर्ट बघितले असता सांगितले की आपल्याला स्वब(Swab)चा रिपोर्ट येण्याची वाट पाहायची नाही,तुला ताबडतोब ऍडमिट करायचे आहे.मला त्यांनी याबाबत काहीही सांगितले नाही.मला त्वरित मालेगाव येथे ऍडमिट करण्यात आले.तेथे डॉ.महाले यांनी माझ्यावर व्यवस्थित उपचार केले व माझा श्वसनाचा त्रास कमी झाला.संपूर्ण जग कोरोना या महामारीने त्रस्त असताना मी दवाखान्यात कोरोना संशयित रुग्ण म्हणून दाखल झालो होतो.कारण माझा कोरोनाचा रिपोर्ट अजून यायचा बाकी होता,तरीही डॉ.महाले यांनी माझ्यावर उपचार केले,यावेळी डॉक्टर देव असल्याची प्रचिती आली कारण सध्याच्या परिस्थितीत कोरोनाचा थोडाही संशय आला कोणतेही हॉस्पिटल रुग्णाला दाखल करून घेत नाही,मलाही तो अनुभव आला...
दुसऱ्या दिवशी माझा रिपोर्ट पॉझिटिव आल्याने मला मालेगाव येथेच Quarantine सेंटर येथे नेण्यात आले,व तेथेच माझ्यावर उपचार करण्यात आले.Quarantine सेंटर बद्दल पण प्रकारच्या अफवा ऐकण्यात होत्या की डॉक्टर व्यवस्थित उपचार करत नाहीत, औषध, गोळ्या आपल्याला लांबूनच फेकून देतात,तसेच जेवण पण लांबून देतात.वास्तविक पाहता तसे काहीही नाही.इथे कार्यरत असणारे डॉ.संदीप खैरनार यांनीही माझी खूप विचारपूस केली. तसेच इतर डॉक्टर दररोज तपासणीसाठी यायचे जवळून विचारपूस करायचे.
तसेच नर्स,वॉर्डबॉय यांनीही खूप चांगल्या प्रकारे वागणूक दिली.असे कधी वाटलेच नाही की आपल्याला कोरोना झाला आहे.त्यातच काही लोकांचा गैरसमज आहे मालेगावला मुस्लिम बांधव कोरोना पसरवण्यास कारणीभूत आहेत,तसे पाहता येथे कार्यरत असलेले श्री.अरीफभाई अन्सारी व श्री.उझेरभाई यांनी मला केलेली मदत मी कधीच विसरू शकत नाही.माणसाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे धर्म बाजूला ठेवून कर्म लक्षात ठेवले पाहिजे
सर्व काही सुरळीत चालू होते.मला कोरोना झाला आहे हे सत्य मी जवळपास विसरूनच गेलो होतो. पण जी वेळ माझ्यावर आली ती कोणावर येऊ नये म्हणून माझे
सर्वाना एकच सांगणे आहे तुम्हाला थोडाही त्रास जाणवल्यास त्वरित डॉक्टरांकडे जा.विनाकारण बाहेर फिरू नका
मास्क चा वापर करा
कारण या प्रत्यक्ष अनुभवातून मी गेलो आहे
समस्त नातलग
या सर्वांनी मला वारंवार फोन करून तसेच संदेश पाठवून तब्येतीची विचारपूस केली.
या सर्वांनी माझे मानसिक धैर्य खचू दिले नाही...
अजून खूप सारे माझे हितचिंतक या सर्वांचे नाव मी लक्षात ठेवू शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व...🙏🏻
सर्वांच्या कृपाशीर्वादाने मी लवकरच कोरोनातून बरा झालो.
सर्वांचे खूप-खूप आभार..🙏🏻🙏🏻
सुरक्षित रहा,काळजी घ्या.
आपलाच...
प्रशांतकुमार राजेंद्र कंकरेज
नामपूर(नाशिक)
Comments
Post a Comment